Tuesday, July 19, 2011

व्वा मुंबईकर व्वा!!!

व्वा मुंबईकर व्वा!!!

दि: १३/०७/२०११ - मुंबईवर दहशतवादी हल्ला!!!
झवेरी बाजार, ऑपेरा हाउस आणि दादर या तिन्ही ठिकाणी सुमारे ११-१२ मिनिटात ३ विस्फोट झाले. नेहमी प्रमाणे मृत आणि इजाग्रस्तांची संख्या कमीच!वृत्त वाहिन्यांना "ब्रेकिंग न्युज" मिळाली. आणि ठळक बातम्या अशा प्रकारे होत्या:
"मुंबई पुन्हा एकदा, बॉम्ब विस्फोटाने हादरली!!!"
"मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा हल्ला!!!"
मुख्यमंत्र्यांचे जनतेला आश्वासन, "शांतता बाळगा. परिस्थिती नियंत्रणात आहे" (मुंबईची परिस्थिती नक्की कोणाच्या नियंत्रणात आहे हे मात्र समजले नाही.)
विरोधी पक्षांचे, सरकारवर आक्षेप गोळे फेकणे सुरु झाले. (सुवर्ण संधी कोण गमवणार हो!!)

भयभीत झालेल्या लोकांची पळापळ सुरु झाली. घराबाहेर असलेल्या लोकांच्या घरी, त्यांचे परिवारवाले चिंतातूर होऊन टि.व्ही. वर "ब्रेकिंग न्युज" पाहू लागले. मनात एक भीती बाळगून, कि आपला माणूस तर सुखरूप असेल ना?


दि: १४/०७/२०११ - बॉम्ब विस्फोटाच्या दुसर्या दिवशी
माणसे आप आपल्या कामावर निघालीत. मुले, स्कूल आणि कॉलेज ला जाऊ लागले. रस्त्यावर फेरीवाले, रिक्षा, टेक्सी, बस, लोकांची वर्दळ, सर्व काही सुरळीतपणे सुरु झालं. वाटत होतं जणू काल संध्याकाळी काही घडलंच नाही! पुन्हा वृत्त वाहिन्या झळकू लागल्या. पण आजचा मसाला जरा वेगळा होता:
"मुंबईचे जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत झाले"
"मुंबईकरांच्या धाडसीपणाला आमचे सलाम"

पण खरंच आपण आपल्या ह्या अश्या वागणुकीसाठी प्रशंसापात्र आहोत? तुम्हाला हि वाटतं का, कि कुणीतरी आपली पाठ थोपटून आपल्याला "शाब्बास" असे म्हणावे, हे असले क्रौर्य सहन करत राहण्यासाठी??म्हणजे काही असामाजिक तत्वांनी आपल्या घरात येऊन आपल्याला त्रास द्यावा, घराची नासधूस करावी आणि मग निघून जावे. मग आपण गप्प राहून आपलं घर पुन्हा सावरायचं, ते सुद्धा कसलीही तक्रार न करता!!! अहो, यात कसलं आलंय धाडस???हे फक्त प्रसार माध्यम व राजनैतिक पक्षांचे जनतेला गप्प करण्यासाठी वापरले जाणारे तोडगे आहेत. मुंबईकरांच्या धाडसीपणाच्या नावाखाली हे बेलगाम नेते व मंत्री आपले ढुंगण झाकून घेतात. म्हणजे एका स्त्रीचा बलात्कार झाल्यानंतर तिला विचारायचं कि "तुला कसं वाटतं? हि घटना तुझ्यासाठी कितपत दु:खद होती??" आणि मग तिच्या अब्रूची लक्तरं वेचून बाजारात त्यांचा लीलाव करावा!!!

हल्लीच्या काळात कुठलीही वस्तू विकत घेतली तर त्यावर "WARRANTY" मिळते. पण ज्यांच्या आधारे संपूर्ण कुटुंबाचे निर्वाह होत असेल, अश्या लोकांचं काय?? काहीच नाही. कारण, सकाळी घरातून कामावर गेलेला माणूस संध्याकाळी परतणार कि नाही, याची खात्री न त्याला असते न त्याच्या घरच्यांना!

आज एक सर्व सामान्य माणूस, सामान्य जीवन जगताना एवढा भयभीत का आहे?? किंवा, आपल्या देशामध्ये फक्त नामवंत आणि राजकीय लोकांच्या प्राणाचे मोल आहे आणि आपण किडे-मुंग्या???

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. पण भारतातील जनता आज हि गुलाम आहे!! कारण गुलामांना सर्व काही (यातना) सहन करत राहायची सवय असते आणि तेच आपण करत आहोत! यासाठी आपल्याला "सलाम" आणि "शाबासकी" मिळाली पाहिजे का??

छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य बालगंगाधर टिळक अश्या अनेक वीर, स्वाभिमानी लोकांचा जन्म ज्या महाराष्ट्रात झाला, त्याच महाराष्ट्राच्या लाडक्या शहर मुंबईची आज काय अवदशा झाली आहे. याला जवाबदार कोण???

अजून किती विस्फोट होतील? अजून किती निर्दोष लोकांचे जीव जातील? कधीपर्यंत आपलं प्रशासन, सरकार व कायदा व्यवस्था एक नपुंसकाची भूमिका बजावत राहणार आणि निर्दोष जनतेच्या जीवावर उठणार?? हे सर्व कधी थांबणार???

पण आपल्याला काय, आपण खूप धाडसी आहोत. किती ही घातक हल्ले होऊ दे, किती ही लोकांनी आपले जीव गमवू दे, आपण सगळं विसरून स्वस्थपणे आपले जीवन पुन्हा सुरळीत करायचे प्रयत्न करू.


खरंच या धाडसाचं अभिमान वाटलं पाहिजे कि लाज!!!


_________ देवेन्द्र बी. लावंत्रा

Tuesday, May 31, 2011

स्मरशील तू .....

आयुष्याच्या या वळणावर
कधीतरी भेटशील तू .
मौन धारण केलेस जरी तू तेव्हा,
कित्येक गोष्टी नजरेने सांगशील तू.

तुला दिलेले वचन मी,
अजूनही पाळतो आहे,
एकांत या ह्रुदयात माझ्या,
नेहमी प्रिये राहशील तू.

एवढे वचन दे आज साजणे,
स्मृतित तुझ्या मला ठेवशील तू.
नसेन मी या जगात जेव्हा,
कधीतरी मला स्मरशील तू.....
___________देव